Friday 3 January 2014

Kille Sudhagad ( Ghera Sudhagad)- 31 st December, 2013




दरवर्षी प्रमाणे यंदाही काही 31stला मुंबईत राहण्याची इच्छा नव्हती. गेली ३ वर्षे कळसुबाई वर नवीन कॅलेंडर वर्षाचा पहिला दिवस अनुभवला होता. पण या वर्षी आठवड्यातील मधलाच दिवस असल्यामुळे कुठे लांब किल्ल्यावर जाणे शक्य नव्हते... आणि मुंबईत अशी शांततेतली जागा शोधणे तसे कठीणच... अगदी दोन दिवस आधी पर्यंत काही नक्की नव्हत...
मग असेच मुंबईच्या जवळील किल्ले बघत होतो तेव्हा सुधागड बद्दल वाचल... तस त्याच्याच जवळील सरसगडला नेहमी जात असे पण सुधागड चा काही मुहूर्त निघत नव्हता. शेवटी ठरलं... सुधागड करायचा आणि तो हि night trek... आधीच आम्हाला माहित नसलेला आणि त्यात रात्री चढायच म्हणजे धाडसच होत खरतर... माहिती काढल्यावर कळल कि वाट फार सोप्पी आहे...
सगळे शिलेदार तय्यार झाले... एकूण १२ जण होतो... ३१ ला दुपारी ३.२५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनल्स (व्ही. टी. ) वरून खोपोली ट्रेन पकडली. खोपोली ला जवळपास ५.४५ ला पोहोचलो. खोपोली वरून पाच्चापूर किंवा ठाकूरवाडी ( पायथ्याचे गाव) हे अंतर ५०-५५ कि.मी. चे. खोपोली – पाली बस किंवा रिक्षा व पालीतून ठाकूरवाडी बस पकडून जाता येत. आम्ही खोपोलीतूनच सरळ रिक्षाने ठाकूरवाडी येथे पोहोचलो तेव्हा रात्रीचे ८ वाजलेले. शाळेच्या समोरूनच, गावातून किल्ल्यावर जाणारी वाट लागते. या वाटेने पुढे गेल्यावर शिड्या लागतात. मूळ शिडी आता बांधलेल्या मोठ्या शिडीच्या खालीच आढळते. इथे आपल्याला कोरीव पायऱ्याही आढळून येतील. इथून थोडासा वर गेल्यावर एखाद दुसरे चढ लागतात. वाट तशी सोप्पी असती दमछाक करणारी मात्र नक्कीच आहे. त्यात आम्ही रात्रीचे चढत होतो म्हणून फार काही त्रास जाणवला नाही. काहीश्या अंतरावर आपल्याला एका खिंडीतून वर चढून गडावर प्रवेश करता येतो. या ठिकाणी दरवाज्याचे अवशेष अजूनही दिसतात. येथील बुरुजावरील दगडच खाली वाटेत पडले आहेत. दरवाज्याने प्रवेश केल्यावर उजवीकडील वाट धरावी, जी भोराई देवी मंदिराकडे घेऊन जाते. वाटेत अनेक वाड्यांचे भग्न अवशेष दिसतात. फक्त भिंतीचे अवशेष आता दिसतात बाकी सगळ शून्य. यावरून खूप मोठा राबता असावा अस जाणवत. महाराज्यांनी रायगडावर राजधानी करण्यापूर्वी सुधागडाचा विचार केला असावा कदाचित.
आम्ही वर गेलो तेव्हा रात्रीचे १०.३० वाजलेले. अमावस्या जवळच होती त्यामुळे ताऱ्यांनी नटलेलं सुंदर आकाश पहावयास मिळालं जे कधीच मुंबईत दिसत नाही. अगदी निरभ्र दिसत होत. असे प्रसंग आयुष्यात खूप कमी अनुभवायला मिळतात. अर्धा तास असेच सगळे मोकळ्या पठारावर झोपून आकाश दर्शनाचा कार्यक्रम करत गप्पा मारत होतो ( अर्थात कोठला तर कुठे, नक्षत्र कुठे याची माहिती फार कुणाला नव्हतीच. उगा आपले तर्क वितर्क करत होते.). उठावेसेच वाटत नव्हते तेथून. त्यावेळी खरच दिवस सार्थकी निघाला असे वाटले.
याच मोकळ्या पठाराला लागुनच पंत सचिवांचा वाडा आहे. अतिशय स्वच्छ आणि सुंदर वाडा आहे. गडावर एक आजी राहते जी हे सगळा  नीट नेटक ठेवत असते कसलेही पैसे न घेता. १५ वर्षापासून हि आजी इथेच राहते. सगळी मदत हि करत असते. गडावर जेवणासाठी भांडी ते अगदी पिण्याच्या पाण्यासाठी कळशी इथपासून सगळी व्यवस्था होते. अशी माणस म्हणजे जणू महाराज्यांचे सेवकच... अगदी निष्ठेने काम करत असतात. गडावर अजून एक माणसाची ओळख झाली तो म्हणजे तिथला पुजारी. एक “भैया” माझ्या राजावर, दैवतावर प्रेम करतो आणि आपलीच काही लोक जाऊन दारू पिऊन घाण करतात. हा मुळचा झारखंड मधला... त्याच्या बोलण्यातून एक सहज निघाल कि अनेक प्रांत तो फिरला, अनेक ठिकाणी राहिला पण फक्त “महाराष्ट्र”च असा एक आहे जिथे बकरी आणि सिंह एकाच तळ्यातल पाणी पितात. ( त्याचेच शब्द... कितीतरी भावना एकाच वाक्यातून सांगून गेला.) याला गडाविषयी सगळी माहिती अगदी आमच्या forest ला पण नसेल इतकी. मला आयुष्यात भेटलेल्या विविधरंगी माणसातील हि एक व्यक्ती. सबंध दिवस पूजा, ध्यानात घालवत असतो. २ - २ दिवस काही न खाता सुद्धा चेहऱ्यावर प्रचंड तेज.
चला किल्ल्याच्या वर्णनावर येऊ पुन्हा.... तर हा वाडा ३ खोल्या आणि चारही बाजूने चौथरा असलेला. ५० माणस सहज झोपू शकतील असा. वाड्याच्या बाजूलाच शंकराचे मंदिर आहे. इथून एक वाट खाली चोर दाराज्याजवळ जाते आणि एक वाट वर भोराई देवीच्या मंदिराकडे जाते. चोर वाट सुस्थितीत आहे अजून पण भिंती कोळ्यांनी भरल्या आहेत. लाखो कोळी असतील कदाचित... भिंतीना हात न लावता खाली उतरला येते. भोराई देवीचे मंदिर अतिशय सुंदर आणि सुस्थितीत आहे. त्यामातेचे रूप खूप सुंदर आहे. अनेक गावातून इथे वेग वेगळ्या दिवशी पुजारी येत असतात. काहींना तर शासकीय पगार पण मिळतो. मंदिराच्या बाहेरच एक खांब आहे ज्याच काम अतिशय सुबक आहे. एका हत्तीच्या पाठीवर हा खांब बांधल्यासारखा भास होतो. इथेच काही सातीशीला पण आहेत. नवरात्रीत या मंदिरात उत्सव असतो देवीचा. इथेच बसण्यासाठी चौथाराही बांधला आहे हल्ली. याच्या बाजूलाच मारुतीरायाचे छोटे मंदिर आहे. अशीच हनुमानाची कोरीव मूर्ती सूरगडावर पण आढळते. इथूनच खाली एक चिरेबंदी वाट आपल्याला महादारावाज्याजवळ घेऊन जाते. महादरवाजा म्हणजे हुबेहूब रायगडावरील महादाराजाज्याची प्रतिकृती. महाराज्यांनी जेवढे किल्ले बांधले त्या सगळ्यांच्या दरवाज्याची रचना अशीच गोमुखी केलीये जेणेकरून शत्रूला चकवा देता यावा अथवा सरळ दरवाज्यावर हल्ला होऊ नये यासाठी. भोराई देवीच्या मंदिराच्या उजवीकडेच दारूकोठारे, हत्तीपंगा चे अवशेष सापडतात. इथून सरळ टोकाकडे चालत गेल्यास रायगडाच्या टकमक टोकासारखे एक टोक आहे.
किल्ल्यावर २ ठिकाणी पाणी आढळते... त्यातले वाड्याच्या डावीकडून खाली उतरल्यावर ३ कोरीव टाकी आहेत पाण्याची तिथे पिण्यायोग्य पाणी मिळते. अजून एक वैशिठ्य म्हणजे महादेवाच्या मंदिराच्या बाजूला एक वाट आहे जी आता विहीर अशी भासते. हि वाट गडावरून थेट नाडसूर या गावी घेऊन जायची पण आता मातीने बुजलीये पूर्णपणे.
अश्या प्रकारे किल्ला पाहून होतो.
किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा अनेक आहेत त्यातील तैलबैला गावातून येणारी सवाष्णीच्या घाटातून धोंडासेमार्गे येणारी एक, दुसरी वाट ठाकूरवाडी मार्गे, तशी सोप्पी. गडावर जेवणाची व्यवस्था आपली आपणच करावी. राहण्याची व्यवस्था पंत सचिवाच्या वाड्यात किंवा भोराई देवीच्या मंदिरात होऊ शकते. ठाकूरवाडी मधून सकाळी ७, ९, ११, दुपारी ३.३०, ५ व शेवटची संध्याकाळची ६ वाजताची एस. टी. पाली मध्ये घेऊन जाते.

काही क्षणचित्रे:-
                                                          चढताना लागणारी शिडी
                                                         सकाळच्या चहा नाश्ताची तयारी

 पंत सचिव वाडा
 भोराई देवी मंदिराकडे जाणारी फरसबंदी वाट
                                              मंदिराबाहेरील स्तंभ- मध्यभागी हत्ती कोरलाय
                                                 भोराई देवीच्या मंदिरा बाहेरील चौथरा

                                                                       भोराई माता



                                                                   आमची छोटी टीम
 मारुतीरायाचे मूर्ती
                                                   महादरवाज्याकडे जाणारी फरसबंदी वाट

                                                                   महादरवाजा





                                                                        चोरवाट





                                              घेरा सुधागड वरून दिसणारा भयानक तैल बैला
                                 चोरवाट- हि वाट गडावरून पाच्चापूरला बाहेर पडते पण आता बुजली




                                                                   भोरेश्वर मंदिर


                                                         जेवणाची तयारी- पिठल भात






                                                 ठाकूरवाडी गावातून गडावर जाताना असलेला



1 comment: