Saturday 28 September 2013

सरसगड श्रमदान मोहीम व किल्ल्याचे वर्णन



दुर्गमित्रहो, गणपती गेले..... आता नवरात्र येईल मग दिवाळी....असे सण चालूच असतात.... चला तर मग आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा दुर्गसंवर्धनासाठी तयार होऊया...

यशवंती Adventures आयोजित
सरसगड श्रमदान मोहीम

दिनांक- २९ सप्टेंबर, २०१३

आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा....

१)    पाली गावातून जी वाट गडावर जाते त्या वाटेवरील ९६ पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या साफ करण्याचे काम पहिल्या मोहिमेतच करण्यात आले. कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वर गेल्यास सुरेख असा दरवाजा आहे. समोरच ५-६ जण राहू शकतील अशी कोरीव गुफा व लागुनच काही पायऱ्या आहेत. दरवाज्यात जमलेल्या मातीचा गाळ तसेच गुंफेतील माती बाहेर काढून गुफा स्वच्छ करण्यात आली.
                                                                                                       

२)    गडावर प्रवेश करताच वर जाणाऱ्या पायऱ्या लागतात, त्यावर अनेक झुडप उगवल्याने वाट दिसत नव्हती. त्या वाटेचा वापर आता सहजतेने करता येतो. तेथून पुढे गेल्यावर अजून एक बुरुज आहे. तो बुरुज सुद्धा काटेरी झुडूपात लपून गेलेला. तो हि आता पूर्ण पणे दिसू लागला आहे.


३)    गडावर प्रवेश करताच एक बुरुज लागतो जेथून पाली शहर संपूर्ण दिसते. त्या बुरुज आज श्रमादानंतर जिवंत दिसू लागला आहे. त्याच बुरुजाच्या वरील बाजूस एक बांधीव टाक आहे ते साफ करण्यात आले... परंतु त्या टाक्यात कमळाची लहान लहान रोप उगवली असल्यामुळे प्रत्येक वेळी ते पूर्वी सारखच होत. तेथूनच पुढे गडाच्या पुढच्या बाजूस जाणारी एक वाट आहे तेथील पायऱ्याची व्यवस्थित बांधणी केली गेली.

४)    इथून पुढे गेल्यास आपण गडाच्या मागील बाजूस जातो येथून पण एक गडावर येणारी वाट आहे. एक सुंदर असा बुरुज आणि एक दरवाजा आहे. बुरुजावर माती साठल्यामुळे व दगड ढासळल्यामुळे बुरुजाची स्थिती फार चांगली नव्हती. तेथील माती साफ करून पडलेले तटबंदीतले दगड पुन्हा रचण्यात आले तसेच तटावरील निवडुंगाची झुडप तोडून टाकण्यात आली. इथेच एक पिण्याच्या पाण्याचे कोरीव टाके आहे येथे बारा माही पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. शिवाय एक चौथरा सदृश्य वास्तूची रचना पण आपल्याला इथे सापडते.

५)    तळ्याच्या इथून पुढे गेल्यावर खाली दिसणारा बुरुज अप्रतिम आहे. बल्लाळेश्वर मंदिर आणि पाली शहराचे सौंदर्य तेथून टिपता येते. किल्ल्याच्या याच बाजूस अनेक गुफा आहेत. एका ठिकाणी चांगले शिल्प पण काढले आहे पण किल्ल्यावर येणाऱ्या समाजकंटकांना त्यावरही लिहिण्याचा मोह झाला असावा. अनेक ठिकाणी शिल्प कोरून ठेवलेली पण आढळतात. तसेच २ ठिकाणी लहान लहान पाण्याची टाकी आहेत. तसच पुढे चालत राहिल्यास गडावर एक परिक्रमा पूर्ण करतो.

६)    गडाच्या वरील बाजूस जाताना एक कपारीत पीर व त्यापुढील कपारीत महादेवाची पिंड आहे. इथून थोडास वर गेल्यावर गडाच्या माथ्यावर प्रवेश करता येतो. वर जाण्याची वाट थोडी अवघडच आहे. एका तुटलेल्या दगडाच्या मधून वर चढावे लागते. वसंत ऋतूत तर इथून माथ्यावर जाणे धोकादायकच आहे. माथ्यावर एका पिराची वास्तू आहे आणि एक छोटेखानी पण अत्यंत सुंदर असे शिव मंदिर आहे. महाशिवारात्रीत इथे उत्सव असतो. मंदिराच्या मागील बाजूस एक तले आहे तेथील पाणी कधी कधी मंदिराच्या गाभार्यात शिरते आणि महादेवाचे स्नान होऊन जाते.
काही फोटो...
 
दरवाज्याची पूर्व स्थिती


                                                                       
                                                                     श्रमादानानंतर