Monday 12 September 2016

सिद्धगड-आहुपे- खोपिवली घाटवाट ट्रेक

जशी श्रावणात नवी पालवी फुटत असते तसेच आज मनाला एक नवी पालवी फुटत होती.
आज मनाच्या दोन्ही बाजूंना अनुभवत होतो, एका बाजूला होणाऱ्या बायकोशी भांडून आल्याचं वाईट आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा सह्याद्रीत जात असल्याच सुख. साला आमचं मन आणि डोकं सह्याद्रीत गेलो की लेखणीच उचलायला लागते, हा आता लेखणीची जागा मोबाईल फोन च्या "स्पर्श पाटी" ने घेतली ती गोष्ट वेगळी.
शनिवारी रात्री पर्यंत अनेक प्लॅन ठरून रद्द केल्यानंतर शेवाटी सिद्धगड- आहुपे प्लॅन ठरला. तरी एका भिडू ने सकाळी आयत्यावेळी बायकोला बर नव्हतं म्हणून घरी बसला. ( नावापुरता कारण मला तर वाटत रात्री आयत्यावेळी सांगितलं म्हणून बायकोशी रात्री भांडला असेल). निघालो 4 जण मग हो नाही करता करता.
छत्रपती शिवाजी टर्मिनल वरून कल्याण साठी सकाळी 9 वाजता ची ट्रेन पकडली. 10 वाजता कल्याण एसटी डेपो ला पोहोचलो, तिथून 10.05 ची लागलेली मुरबाड गाडी पकडली. हि एसटी म्हणजे आम्हाला आशीर्वादाच जणू, सगळी कोपऱ्यातील गाव पण जोडली गेली म्हणून आम्ही जाऊ शकलो. आणि त्यातली सीट म्हणजे मसाज पार्लरचं. 11.10 वाजता मुरबाडला पोहोचलो, तिथून लगेच 11.15 वाजता सुटणारी, नारीवली मार्गे जाणारी गोरखगड गाडी पकडली. रास्ता तसा अरुंदच होता, एका वेळी एक एसटी जाईल एव्हढाच. सलाम एसटी चालकांना. "कोना कोना ...." असं ब्रीद मिरवणाऱ्या बँकेला पण हे कोने माहित नसतील.
माणुसकी जिवंत असल्याचा अनुभव आला, एसटी हे एकमात्र वाहन अशा ठिकाणी घरी जायला. आमच्या चालक मामाने आरशातून बसच्या मागे धावत येणारा एक 65 ची च्या घरातला मानूस पहिला आणि त्याने गाडी थांबवली 3-4 मिनिट. नाहीतर आपले टॅक्सीवाले, माजच असतो त्यांना.
खडतर, अरुंद रस्त्याने सुखरूप पणे आम्ही उचले या गावी पोहोचलो. सिद्धगडावर अलीकडच्या नारीवली या गावातून पण जाता येते. उचल्याहून निघाल्यावर एक लहानसा ओढा लागतो तो सोडल्यावर उजव्याबाजूने सिद्धगडाला जाते तर डावीकडची गोरखगडाला. उजवीकडून गेल्यावर अजून एक ओढा लागला, मग शेत बांध्यावरून आम्ही खालील वाडीत पोहोचलो. मुळात सिद्धगडवाडीत वाडीत राहणारी अनेक कुटुंब आता खाली आली आहेत या वाडीत. याच वाडीतून वाट वर जाते. गडावरून येणार खळखळाता ओढा कानांना आनंद देत होता. याच ओढ्याला उजव्या हाताला ठेऊन आम्ही चढ सुरु केला. वाटेत एक झोपडी लागली, वाट तशी घनदाट जंगलातूनच जाते. त्यात भीमाशंकर उभारण्याचा हा भाग म्हणजे सदैव पाऊस आणि धुकं. इथूनच साधारण तासाभराच्या चढाई नंतर खळ खळणाऱ्या ओढ्याला ओलांडून जाण्याची वेळ येते. तिथेच आम्ही वन भोजन करून चढाईला सुरुवात केली. या ओढ्यापासून साधारण आजून तासाभराच्या चढाई नंतर आम्ही महादरावाज्यापाशी आलो, तटबंदी उरलेली नाहीये आता पण सुंदर दरवाजा आहे. याच दरवाज्याचा बाहेरील अंगाला असणाऱ्या पठारावर एक सुंदर शिवकालीन स्मारक दिसते, या मोकळ्या पठारावर धुक्यात लपलेला सिद्धगड माथा उजव्या अंगाला आणि डावीकडील भीमाशंकर पर्वत रांगे मधील डोंगर पाहताना मन तृप्त होते.
अचानक लक्ष गेले ते सिद्धगडाच्या कातळ कड्यात लपलेल्या एका कोरीव गुफेकडे ( तो बाबा राहायचा ती गुफा नव्हे, त्या व्यतिरिक्त एक कोरीव गुफा आहे आणि त्यापेक्षाही मोठी.) पुढच्यावेळी ह्या गुफेत जाण्याचा मार्ग नक्की शोधणार. गावकऱ्यांकडून समजलं की वर जाणारी एक पायवाट आहे. ते सह्य-सौन्दर्य आणि गुंफेच गूढ मनात साचवुन आम्ही पुन्हा महादरावाज्यात प्रवेश केला . प्रवेश केल्यावर डावीकडे एक मंदिर लागते. मंदिराचं रूप मन सुखावून टाकत. आणि मुख्य म्हणजे मंदिर सुस्थितीत आहे. मंदिराच्या आजूबाजूला अनेक शिळा पडलेल्या सापडतात. एक उघड्यावरील गणेश मंदिर दिसते. एक तोफ सुद्धा आहे इथे. कदाचित ती वरून कोसळलेली असावी. हि अशी मंदिरचं आम्हा भटाक्यांचं आश्रयस्थान.
इथूनच पुढे सिद्धगड वाडी ( अवकाशातील गाव असच म्हणतो मी या वाडीला). गावात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच घर उरली आहेत, काही वर्षात ती पण जातील कारण एका बाजूला जमीन खाचल्यामुळे या वाडीतील लोकांना गडाखालील गावात जागा दिली आहे.
इथे एक शाळा सुद्धा आहे पण आता शाळा बंद झालीये आणि गावातील काही तरुण रात्री निवाऱ्यासाठी वापर करतात आणि शनिवार रविवार आमच्यासारखे भटक्यांना आधार. इथूनच शाळेच्या मागून सिद्धगड माथ्यावर जाण्यास साधारण दीड तास लागतो, खडी चढ अंगावर काटा आणते. वाटेत एक गुफा आहे, तिथे पूर्वी एक बाबा राहायचा, त्याचा निवारा होता तो. अखंड कातळात कोरलेली हि गुफा म्हणजे एक आश्रर्यच आहे. गुफेच्या बाहेर लिहिलंय "ब्रह्मांडाची उघडी गुरुकिल्ली". या वाक्याचा बोध प्रत्येकाने घ्यावा. इथे बसल्यावर स्वत्वाचा शोध लागणारचं. ह मानसिक आणि  नेत्रसुख कुठेही मिळणार नाही. गुफेपासून वर अर्ध्यातासाच्या चढाई नंतर माथा लागतो, फार अवशेश नाहीयेत. दोन्ही बाजूंना दोन बुरुज त्यात उजवीकडील बुरुज अजूनही शाबूत, तिथेच एक एका पडलेला दरवाजा. इथून गोरखगड आणि मच्छिन्द्रगडाचे सुळके नजर वळवून घेतात. खालील सिद्धगड वाडीही चिमुकली दिसू लागते. पावसात माथ्यावर न जाणचं योग्य. बाकीच्यावेळी माथावरून दिसणारे दृश्य विहंगम. माथ्यावरच पाण्याची 4 टाकी आणि उघड्यावर वसलेलं एक मंदिर आहे. खाली उतरताना खूप सांभाळून उतरावे लागते. डिसेंबर मध्ये आलेलो तेव्हा अनेक नावख्यांचा चड्यांचा रंग मागून लाल झालेला. बसत बसत उतरलेले. वरील वाडीत जेवणाची व्यवस्था गावकरी करतात, जास्त जण असतील तर मात्र पंचाईत होते . आधी कळवा किंवा सामान घेऊन जा.
आम्ही रात्री मंदिरात मुक्काम करायचं ठरवलं. दिवसा सुंदर वाटणार मंदिर रात्री मात्र भयाण रूप घेत. आजू बाजूला कोणीही नाही त्यात जंगली जनावारांचे आवाज झोप उडवून टाकतात. पावसाने सुरु केलेला ताशा, रातकिड्यांचे आवाज, मध्येच येणार पावलांचा आवाज झोप उडवून टाकली. वाटलं पहाट होईल इतक्यात म्हणून घड्याळ पाहिलं तर फक्त रात्रीचे 11 वाजलेले. रात्र कशी जाईल याच टेन्शन यायला लागल होत. आमच्यातील आमचा बैल मित्र झोपला हातपाय पसरून आम्ही तिघेच जागे. वेळ जात नव्हता मग एकाने मोबाइल बाहेर काढला आणि सांगितलं सिनेमा बघूया. एकमत झाल आणि सकाळी 4 वाजेपर्यंत सुपर स्टार चा "कबाली" आणि कधी पहाणार पण नाही असा "ढिशुम" पहिला. 4 वाजता कुठे झोप लागली. सकाळी 7 वाजता उठून आवरलं पटापट कारण अजून आहुपे घाट करायचा होता. सकाळी 7.50 ला मंदिर सोडले. दारावाज्यापासून आडवी डोंगरांना चिकटून गेलेली वाट चालत होतो, काही ठिकाणी वाट कोसळली आहे. डोंगरातून येणारे 3 ओढे पार केल्यानंतर एका खड्या चढाई ने एका मोकळ्या कातळावर पोहोचलो. जीव काढणारीच चढ होती ती. थोडा आराम केल्यानंतर चालण्यास सुरुवात केली, इथे दोन वाटा फुटतात, सरळ जाणारी भीमाशंकर तर उजवीकडे जंगलात गेलेली आहुपे गावाकडे. एव्हाना इथवर यायला 9 वाजलेले. अहुप्याकडे जाणाऱ्या किर्रर्र झाडीत शिरलो आम्ही. सकाळी सुद्धा रात्रीचा अनुभव येत होता. या पठारावर सदैव धुकं माजलेल असत त्यामुळे माहित नसेल वाट तर न जाणच बर नाहीतर कुठे  भटकाल याचा पत्ता लागायचा नाही. एक पठार पार केल्यावर पुन्हा एका तिरप्या चढाईला लागलो ती पार करून पुन्हा एक मोकळे पठार लागले. परत झाडीत प्रवेश करून एका मोकळ्या पठारावर लागलो, मग पठारावरून मार्ग काढत भीमाशंकर वरून येणाऱ्या मोठ्या वाटेला  लागलो . पण ही वाट नसेल माहित तर वाटाड्या घेतलेलाच बरा नाहीतर 100% हरवणार. ज्या मोठ्या वाटेला लागलो तिथून भीमाशंकर वरून पूर्वी गाडी वाट होती अस एक गावकरी म्हणत होता. हीच वाट न सोडता सरळ उतरत गेलो. वाटेत मधेच एका मोठ्या कातळावर आपल्या देशाच्या नाकाशास्वरूपी कोरलेल्या पण गणपती स्वरूप दिसणाऱ्या देवस्थानाचे दर्शन झाले. पुढे एक मेंढी, गायीचं कळप चरायला घेऊन जाणाऱ्या आजीचे दर्शन झाले. तब्बल 5-6 तासानंतर एक माणूस दिसला मधल्या काळात कोणच नव्हतं, आम्हीच 4 माकड. आजी जेव्हा संगीतल सिद्धगडावरून आलो तेव्हा तिला विश्वासच बसेना म्हणाली या दिवसात नाही येत तिथुन कोणी. तिच्याकडे आष्यर्यपूर्वक नजरेने बघत आम्ही आहुपे गावाच्या वाटेला लागलो. सिद्धगडावरून निघाल्या नंतर चार - साडे चार तास लागले होते इथे यायला. गाव तस सुधारालाय आता. इक महाविद्यालय, एक आश्रम बांधला गेलाय. इथला कातळकडा घाटावर आल्याची जाणीव करावुन देतो.
डांबरी रस्त्याला लागून पुन्हा डावीकडे वाट चालू केली आम्ही कारण आम्हाला खोपिवली ला उतरायचं होत इथून. खालील कोकणाची खोली इथून दिसते. अजस्त्र कडे भीती देतात. इथूनच उतरावं लागणार होत आम्हाला. एका नजरेत भरणाऱ्या गर्द झाडीतून हि वाट खाली उतरते. कड्याकपरीतून उतरण्याचा अनुभव जबरदस्त येत होता. जसे जसे खाली उतरत होतो तसे तसे अंगावर येणारा कडा रौद्र वाटत होता. वाटेत एका कातळात कोरलेली 2 पाण्याची टाकी दिसली. पुरवी घाट वाटेकऱ्यांसाठी कि केलेली सुविधा असावी. थोड्याच वेळात गोरख आणि मच्छिन्द्रगडाचे दुसऱ्या अंगाने दर्शन झाले. गर्द रानातून या वाटेने आम्ही खाली आलो तेव्हा स्वछ आणि खळ खळत्या ओढ्यात अंघोळ करण्याचा मोह आम्हाला आवरला नाही. 2 दिवसाच्या श्रमाचा परिहार घेत होतो आम्ही त्या पाण्यात. इथूनच थोड्याच अंतरावर खोपिवली गाव लागले. आम्ही खोपिवली- म्हसा- मुरबाड- कल्याण असा प्रवास करत मुंबईस परतलो.
फार सुखद अनुभव होता हा. 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट मोठा वीकएंड आला होता, शनिवार, रविवार आणि सोमवार सुट्टी म्हणून सगळेच बाहेर पडले असतील सह्याद्रीत. नको असलेली गर्दी टाळण्यासाठी हा ट्रेक निवडला आणि आयुष्यभर पुरेल एव्हडा अनुभव घेऊन आलो परत.


गौरव भावे.