Tuesday 25 November 2014

Kille Sarasgad किल्ले सरसगड

किल्ले सरसगड

नावाप्रमाचेच सरस असणारा हा किल्ला. पाली बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे एक भेदक, टोपी सारखा दिसणारा कातळकडा म्हणजेच सरसगड. मंदिराच्या मागूनच हमरस्त्यावरून पुढे गेल्यावर डावीकडे वळल्यावर एक वाट गडावर  जाते. वाट तशी सोप्पीच आहे. जेमतेम सव्वा किंवा दीड तासात किल्ल्यावर पोहोचता येते. वाटेत एक सुकलेल पाण्याच टाक आहे. पहिला टप्पा चढल्यावर सरसगडाची उभी कातळ भिंत अजून रौद्र रूप धारण करू लागते.म्हणूनच नैसर्गिक तटबंदी लाभलेल्या या किल्ल्याला तशी फारशी अशी तटबंदी अशी नाहीच आहे. वाटेत २ टप्पे चढून गेल्यावर एक छोटी पण खडी चढ लागते. तिथून मागे वळून पाली शहर समोर दिसते. थंडीच्या दिवसात तर धुक्याची चादर पूर्ण पाली ने ओढलेली असते. जर आकाश निरभ्र असेल तर पाली तालुक्यातीलच सुधागड, आणि पुण्यात मोडणारा तैलबैला यांचे दर्शन होते.
इथून पुढे एका भूयारासारख्या भासणार्या पहारेकर्यांच्या निवासाची जागा आहे. इथे धोपार्यानेच रेंगत आत जावे, आत गेल्यावर एक माणूस उभा राहू शकेल एवढी उंची आहे. सरसगडाचे वैशिष्ठ्य म्हणजे कातळात कोरलेल्या ९६ पायऱ्या. एका बाजूला उंच कातळ भिंत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरीतर धडकीच भरायला लावते. भिंतीचा आधार घेत इथून वर चढावे. या पायऱ्या म्हणजे शत्रूला थोपवण्यासाठीच्या उत्तम जागा. पायऱ्या चढल्यावर गोमुखी स्वरूप असलेल्या आणि अखंड कातळात कोरलेल्या दरवाज्याचे दर्शन होते. तिथेच पहारेकार्याच्या देवड्या पण आढळतात. ४ -५ माणसे झोपु शकतील अशी हि जागा. गडावर फार असे अवशेष नसले तरी कातळात कोरलेल्या अनेक गुफा, गुफांमध्ये अनेक ठिकाणी शिल्प कोरली आहेत. त्यातील खास पाहण्यासारखी म्हणजे एका गुफेच्या माथ्यावर असलेले गणेशाचे लहानसे शिल्प, आणि एक मोठे भित्तीशिल्प आहे त्यात सीता हरणाची गोष्ट कोरून ठेवली आहे असा माझा अंदाज. मागचा दरवाजा हा पूर्ण पणे बांधून काढला आहे. इथेच वर बारमाही पाण्याचे टाके आहे. जेव्हा गावात पाणी नसते तेव्हा इथून पाईप लाऊन पाणी काढले जाते. इथूनच थोडे वर चढून किल्ल्याच्या माथ्यावर जाता येते. भोलेनाथाचे सुंदर असे मंदिर इथे आहे. एका पीराचेहि अवशेष इथे आहेत. महाशिवरात्रीला भोलेनाथाच्या मंदिरात मोठा उत्सव असतो. मंदिराच्या बाजूलाच एक कमळाच्या फुलांनी भरलेले एक तळे आहे. माथा लहानच असला तरी तहळणी साठी उत्तम आहे. घाट माथ्याकडून कोकणात उतरणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठीच याचा वापर केला जात असावा.
असा हा सरसगड. पाली बाल्लाळेश्वराच्या मंदिरात (धुंडी विनायाकाच्या मंदिरात) याचा उल्लेख आढळतो.
या सरसगडावर गिरगावातील यशवंती Adventures तर्फे दुर्ग संवर्धनाचे कार्य गेली २ वर्ष सातत्याने राबविण्यात येत आहे.  मुख्य दरवाज्यातून गडावर जाणार्या पायऱ्या, गडाचे बुरुज, मुख्य आणि मागील दरवाज्याची स्वच्छता, गडावर माहिती फलक लावणे अशा विविध प्रकारची कामे केली जात आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
संतोष गुरव – ९२२२९२२०४८
भरत म्हदये – ९७७३४१०७१७

गौरव भावे- ९६९९८१४६२५





























Wednesday 29 January 2014

चौथी सीट --- माझी मुंबई


                          आज बऱ्याच महिन्यानंतर घर ते ऑफिस प्रवास ट्रेन ने केला. गाडी आल्यापासून तसा कंटाळाच यायचा ट्रेन ने जाण्याचा... घरातून फुल ओन झेक पेक होऊन निघून सुद्धा ऑफिसमध्ये पोहोचता पोहोचता सगळ विस्कटलेल असायच... अजून बरच काही... आज खूप महिन्यांनी आमच्या काळ्या बुटांना पोलिश करण्याची वेळ आली आहे अस ट्रेन मधून उतरल्यावर वाटल... अनेक ओळखीचे चेहरे दिसले... गप्पा मारता आल्या. चौथी सीट पकडताना एकाचा सणसणीत धक्का लागला. २ क्षण वाटले थोबाडीत द्याव म्हणून पण परत मनात विचार आला... कशाला उगाच १५ मिनिटांचा प्रवास, परत कुठे भेटणार हा. त्यापेक्षा जाऊदे ना, म्हणून हसत उच्चारलो "ट्रेन आहे धक्के लागतातच..." त्याच्या चेहऱ्यावर पण हास्य उमटले.
                 अशीच काही तरी आहे माझी मुंबई... सवय लावणारी... कितीही त्रास असला तरी सगळ adjust करायला लावणारी. भले भले शहाणे येतात आणि हिच्या पुढे नतमस्तक होतात. चांगले वाटतात ते ट्रेन मध्ये बसणारे धक्के कारण त्याच ट्रेन च्या डब्याने रक्ताची नसलेली पण जीवाला जीव देणारी माणस दिलेली असतात...
"आमची मुंबई" बोलण्यापेक्षा "माझी मुंबईच" बोलणं पसंत म्हणूनच करतो.



अनेक प्रसंग अगदी छोटे असतात पण बरच काही शिकवून जातात... तेच लहान लहान अनुभव घेऊन आयुष्य बनत... आयुष्य म्हणजे अशाच लहान लहान Episode चा संच असतो.

जे सुचाल ते लिहल... चुकल असेल तर सोडून द्या...सारांश महत्वाचा.... भा. पो. ( भावना पोहोचल्या) बरोबर न मित्रांनो...

Friday 3 January 2014

Kille Sudhagad ( Ghera Sudhagad)- 31 st December, 2013




दरवर्षी प्रमाणे यंदाही काही 31stला मुंबईत राहण्याची इच्छा नव्हती. गेली ३ वर्षे कळसुबाई वर नवीन कॅलेंडर वर्षाचा पहिला दिवस अनुभवला होता. पण या वर्षी आठवड्यातील मधलाच दिवस असल्यामुळे कुठे लांब किल्ल्यावर जाणे शक्य नव्हते... आणि मुंबईत अशी शांततेतली जागा शोधणे तसे कठीणच... अगदी दोन दिवस आधी पर्यंत काही नक्की नव्हत...
मग असेच मुंबईच्या जवळील किल्ले बघत होतो तेव्हा सुधागड बद्दल वाचल... तस त्याच्याच जवळील सरसगडला नेहमी जात असे पण सुधागड चा काही मुहूर्त निघत नव्हता. शेवटी ठरलं... सुधागड करायचा आणि तो हि night trek... आधीच आम्हाला माहित नसलेला आणि त्यात रात्री चढायच म्हणजे धाडसच होत खरतर... माहिती काढल्यावर कळल कि वाट फार सोप्पी आहे...
सगळे शिलेदार तय्यार झाले... एकूण १२ जण होतो... ३१ ला दुपारी ३.२५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनल्स (व्ही. टी. ) वरून खोपोली ट्रेन पकडली. खोपोली ला जवळपास ५.४५ ला पोहोचलो. खोपोली वरून पाच्चापूर किंवा ठाकूरवाडी ( पायथ्याचे गाव) हे अंतर ५०-५५ कि.मी. चे. खोपोली – पाली बस किंवा रिक्षा व पालीतून ठाकूरवाडी बस पकडून जाता येत. आम्ही खोपोलीतूनच सरळ रिक्षाने ठाकूरवाडी येथे पोहोचलो तेव्हा रात्रीचे ८ वाजलेले. शाळेच्या समोरूनच, गावातून किल्ल्यावर जाणारी वाट लागते. या वाटेने पुढे गेल्यावर शिड्या लागतात. मूळ शिडी आता बांधलेल्या मोठ्या शिडीच्या खालीच आढळते. इथे आपल्याला कोरीव पायऱ्याही आढळून येतील. इथून थोडासा वर गेल्यावर एखाद दुसरे चढ लागतात. वाट तशी सोप्पी असती दमछाक करणारी मात्र नक्कीच आहे. त्यात आम्ही रात्रीचे चढत होतो म्हणून फार काही त्रास जाणवला नाही. काहीश्या अंतरावर आपल्याला एका खिंडीतून वर चढून गडावर प्रवेश करता येतो. या ठिकाणी दरवाज्याचे अवशेष अजूनही दिसतात. येथील बुरुजावरील दगडच खाली वाटेत पडले आहेत. दरवाज्याने प्रवेश केल्यावर उजवीकडील वाट धरावी, जी भोराई देवी मंदिराकडे घेऊन जाते. वाटेत अनेक वाड्यांचे भग्न अवशेष दिसतात. फक्त भिंतीचे अवशेष आता दिसतात बाकी सगळ शून्य. यावरून खूप मोठा राबता असावा अस जाणवत. महाराज्यांनी रायगडावर राजधानी करण्यापूर्वी सुधागडाचा विचार केला असावा कदाचित.
आम्ही वर गेलो तेव्हा रात्रीचे १०.३० वाजलेले. अमावस्या जवळच होती त्यामुळे ताऱ्यांनी नटलेलं सुंदर आकाश पहावयास मिळालं जे कधीच मुंबईत दिसत नाही. अगदी निरभ्र दिसत होत. असे प्रसंग आयुष्यात खूप कमी अनुभवायला मिळतात. अर्धा तास असेच सगळे मोकळ्या पठारावर झोपून आकाश दर्शनाचा कार्यक्रम करत गप्पा मारत होतो ( अर्थात कोठला तर कुठे, नक्षत्र कुठे याची माहिती फार कुणाला नव्हतीच. उगा आपले तर्क वितर्क करत होते.). उठावेसेच वाटत नव्हते तेथून. त्यावेळी खरच दिवस सार्थकी निघाला असे वाटले.
याच मोकळ्या पठाराला लागुनच पंत सचिवांचा वाडा आहे. अतिशय स्वच्छ आणि सुंदर वाडा आहे. गडावर एक आजी राहते जी हे सगळा  नीट नेटक ठेवत असते कसलेही पैसे न घेता. १५ वर्षापासून हि आजी इथेच राहते. सगळी मदत हि करत असते. गडावर जेवणासाठी भांडी ते अगदी पिण्याच्या पाण्यासाठी कळशी इथपासून सगळी व्यवस्था होते. अशी माणस म्हणजे जणू महाराज्यांचे सेवकच... अगदी निष्ठेने काम करत असतात. गडावर अजून एक माणसाची ओळख झाली तो म्हणजे तिथला पुजारी. एक “भैया” माझ्या राजावर, दैवतावर प्रेम करतो आणि आपलीच काही लोक जाऊन दारू पिऊन घाण करतात. हा मुळचा झारखंड मधला... त्याच्या बोलण्यातून एक सहज निघाल कि अनेक प्रांत तो फिरला, अनेक ठिकाणी राहिला पण फक्त “महाराष्ट्र”च असा एक आहे जिथे बकरी आणि सिंह एकाच तळ्यातल पाणी पितात. ( त्याचेच शब्द... कितीतरी भावना एकाच वाक्यातून सांगून गेला.) याला गडाविषयी सगळी माहिती अगदी आमच्या forest ला पण नसेल इतकी. मला आयुष्यात भेटलेल्या विविधरंगी माणसातील हि एक व्यक्ती. सबंध दिवस पूजा, ध्यानात घालवत असतो. २ - २ दिवस काही न खाता सुद्धा चेहऱ्यावर प्रचंड तेज.
चला किल्ल्याच्या वर्णनावर येऊ पुन्हा.... तर हा वाडा ३ खोल्या आणि चारही बाजूने चौथरा असलेला. ५० माणस सहज झोपू शकतील असा. वाड्याच्या बाजूलाच शंकराचे मंदिर आहे. इथून एक वाट खाली चोर दाराज्याजवळ जाते आणि एक वाट वर भोराई देवीच्या मंदिराकडे जाते. चोर वाट सुस्थितीत आहे अजून पण भिंती कोळ्यांनी भरल्या आहेत. लाखो कोळी असतील कदाचित... भिंतीना हात न लावता खाली उतरला येते. भोराई देवीचे मंदिर अतिशय सुंदर आणि सुस्थितीत आहे. त्यामातेचे रूप खूप सुंदर आहे. अनेक गावातून इथे वेग वेगळ्या दिवशी पुजारी येत असतात. काहींना तर शासकीय पगार पण मिळतो. मंदिराच्या बाहेरच एक खांब आहे ज्याच काम अतिशय सुबक आहे. एका हत्तीच्या पाठीवर हा खांब बांधल्यासारखा भास होतो. इथेच काही सातीशीला पण आहेत. नवरात्रीत या मंदिरात उत्सव असतो देवीचा. इथेच बसण्यासाठी चौथाराही बांधला आहे हल्ली. याच्या बाजूलाच मारुतीरायाचे छोटे मंदिर आहे. अशीच हनुमानाची कोरीव मूर्ती सूरगडावर पण आढळते. इथूनच खाली एक चिरेबंदी वाट आपल्याला महादारावाज्याजवळ घेऊन जाते. महादरवाजा म्हणजे हुबेहूब रायगडावरील महादाराजाज्याची प्रतिकृती. महाराज्यांनी जेवढे किल्ले बांधले त्या सगळ्यांच्या दरवाज्याची रचना अशीच गोमुखी केलीये जेणेकरून शत्रूला चकवा देता यावा अथवा सरळ दरवाज्यावर हल्ला होऊ नये यासाठी. भोराई देवीच्या मंदिराच्या उजवीकडेच दारूकोठारे, हत्तीपंगा चे अवशेष सापडतात. इथून सरळ टोकाकडे चालत गेल्यास रायगडाच्या टकमक टोकासारखे एक टोक आहे.
किल्ल्यावर २ ठिकाणी पाणी आढळते... त्यातले वाड्याच्या डावीकडून खाली उतरल्यावर ३ कोरीव टाकी आहेत पाण्याची तिथे पिण्यायोग्य पाणी मिळते. अजून एक वैशिठ्य म्हणजे महादेवाच्या मंदिराच्या बाजूला एक वाट आहे जी आता विहीर अशी भासते. हि वाट गडावरून थेट नाडसूर या गावी घेऊन जायची पण आता मातीने बुजलीये पूर्णपणे.
अश्या प्रकारे किल्ला पाहून होतो.
किल्ल्यावर जाणाऱ्या वाटा अनेक आहेत त्यातील तैलबैला गावातून येणारी सवाष्णीच्या घाटातून धोंडासेमार्गे येणारी एक, दुसरी वाट ठाकूरवाडी मार्गे, तशी सोप्पी. गडावर जेवणाची व्यवस्था आपली आपणच करावी. राहण्याची व्यवस्था पंत सचिवाच्या वाड्यात किंवा भोराई देवीच्या मंदिरात होऊ शकते. ठाकूरवाडी मधून सकाळी ७, ९, ११, दुपारी ३.३०, ५ व शेवटची संध्याकाळची ६ वाजताची एस. टी. पाली मध्ये घेऊन जाते.

काही क्षणचित्रे:-
                                                          चढताना लागणारी शिडी
                                                         सकाळच्या चहा नाश्ताची तयारी

 पंत सचिव वाडा
 भोराई देवी मंदिराकडे जाणारी फरसबंदी वाट
                                              मंदिराबाहेरील स्तंभ- मध्यभागी हत्ती कोरलाय
                                                 भोराई देवीच्या मंदिरा बाहेरील चौथरा

                                                                       भोराई माता



                                                                   आमची छोटी टीम
 मारुतीरायाचे मूर्ती
                                                   महादरवाज्याकडे जाणारी फरसबंदी वाट

                                                                   महादरवाजा





                                                                        चोरवाट





                                              घेरा सुधागड वरून दिसणारा भयानक तैल बैला
                                 चोरवाट- हि वाट गडावरून पाच्चापूरला बाहेर पडते पण आता बुजली




                                                                   भोरेश्वर मंदिर


                                                         जेवणाची तयारी- पिठल भात






                                                 ठाकूरवाडी गावातून गडावर जाताना असलेला