Tuesday 25 November 2014

Kille Sarasgad किल्ले सरसगड

किल्ले सरसगड

नावाप्रमाचेच सरस असणारा हा किल्ला. पाली बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे एक भेदक, टोपी सारखा दिसणारा कातळकडा म्हणजेच सरसगड. मंदिराच्या मागूनच हमरस्त्यावरून पुढे गेल्यावर डावीकडे वळल्यावर एक वाट गडावर  जाते. वाट तशी सोप्पीच आहे. जेमतेम सव्वा किंवा दीड तासात किल्ल्यावर पोहोचता येते. वाटेत एक सुकलेल पाण्याच टाक आहे. पहिला टप्पा चढल्यावर सरसगडाची उभी कातळ भिंत अजून रौद्र रूप धारण करू लागते.म्हणूनच नैसर्गिक तटबंदी लाभलेल्या या किल्ल्याला तशी फारशी अशी तटबंदी अशी नाहीच आहे. वाटेत २ टप्पे चढून गेल्यावर एक छोटी पण खडी चढ लागते. तिथून मागे वळून पाली शहर समोर दिसते. थंडीच्या दिवसात तर धुक्याची चादर पूर्ण पाली ने ओढलेली असते. जर आकाश निरभ्र असेल तर पाली तालुक्यातीलच सुधागड, आणि पुण्यात मोडणारा तैलबैला यांचे दर्शन होते.
इथून पुढे एका भूयारासारख्या भासणार्या पहारेकर्यांच्या निवासाची जागा आहे. इथे धोपार्यानेच रेंगत आत जावे, आत गेल्यावर एक माणूस उभा राहू शकेल एवढी उंची आहे. सरसगडाचे वैशिष्ठ्य म्हणजे कातळात कोरलेल्या ९६ पायऱ्या. एका बाजूला उंच कातळ भिंत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरीतर धडकीच भरायला लावते. भिंतीचा आधार घेत इथून वर चढावे. या पायऱ्या म्हणजे शत्रूला थोपवण्यासाठीच्या उत्तम जागा. पायऱ्या चढल्यावर गोमुखी स्वरूप असलेल्या आणि अखंड कातळात कोरलेल्या दरवाज्याचे दर्शन होते. तिथेच पहारेकार्याच्या देवड्या पण आढळतात. ४ -५ माणसे झोपु शकतील अशी हि जागा. गडावर फार असे अवशेष नसले तरी कातळात कोरलेल्या अनेक गुफा, गुफांमध्ये अनेक ठिकाणी शिल्प कोरली आहेत. त्यातील खास पाहण्यासारखी म्हणजे एका गुफेच्या माथ्यावर असलेले गणेशाचे लहानसे शिल्प, आणि एक मोठे भित्तीशिल्प आहे त्यात सीता हरणाची गोष्ट कोरून ठेवली आहे असा माझा अंदाज. मागचा दरवाजा हा पूर्ण पणे बांधून काढला आहे. इथेच वर बारमाही पाण्याचे टाके आहे. जेव्हा गावात पाणी नसते तेव्हा इथून पाईप लाऊन पाणी काढले जाते. इथूनच थोडे वर चढून किल्ल्याच्या माथ्यावर जाता येते. भोलेनाथाचे सुंदर असे मंदिर इथे आहे. एका पीराचेहि अवशेष इथे आहेत. महाशिवरात्रीला भोलेनाथाच्या मंदिरात मोठा उत्सव असतो. मंदिराच्या बाजूलाच एक कमळाच्या फुलांनी भरलेले एक तळे आहे. माथा लहानच असला तरी तहळणी साठी उत्तम आहे. घाट माथ्याकडून कोकणात उतरणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठीच याचा वापर केला जात असावा.
असा हा सरसगड. पाली बाल्लाळेश्वराच्या मंदिरात (धुंडी विनायाकाच्या मंदिरात) याचा उल्लेख आढळतो.
या सरसगडावर गिरगावातील यशवंती Adventures तर्फे दुर्ग संवर्धनाचे कार्य गेली २ वर्ष सातत्याने राबविण्यात येत आहे.  मुख्य दरवाज्यातून गडावर जाणार्या पायऱ्या, गडाचे बुरुज, मुख्य आणि मागील दरवाज्याची स्वच्छता, गडावर माहिती फलक लावणे अशा विविध प्रकारची कामे केली जात आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
संतोष गुरव – ९२२२९२२०४८
भरत म्हदये – ९७७३४१०७१७

गौरव भावे- ९६९९८१४६२५