Friday 5 January 2018

किल्ले तोरणा (Kille Torna Trek) 31/12/2017 & 1/01/2018

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशामहाराष्ट्राचे असे वर्णन ज्या सह्याद्रीमुळे केले जाते, ज्या सह्याद्रीला माझ्या गडकोटांचं, लेण्यांच कोंदण लाभलंय, ज्या सह्याद्रीला माझ्यासारखे अनेक दुर्गवेडे आणि निसर्गप्रेमी माय बाप मानतात, अश्या सह्याद्रीमधून पुन्हा खूप सुंदर आठवणींची शिदोरी  घेऊन घरी आलो. गेली 8 वर्षे नवीन कॅलेंडर वर्षाचा पहिला दिवस सह्याद्रीच्या सानिध्यात घालवत आलो आहे. या वर्षी बेत ठरला तो तोरणा गडाचा. हल्ली प्रामाणिक ट्रेकर्स सोबत, अनेक हौशी व केवळ मजेसाठी गडावर येणारे लोक पण गडावर येतात मोठ मोठ्याने गाणी लावून गडावरील त्या शांततेचा भंग करतात म्हणून अशी गर्दी टाळण्यासाठी आणि 30 लोकांची जेवण आणि निवाऱ्याची व्यवस्था होऊ शकेल या दृष्टीने तोरणा गडाची निवड केली. 
सह्याद्री म्हणजे गडकोटांची एक अफाट रांग, पण जसे एखाद्या दागिन्यात अनेक हिरे, माणके असतात तसेच सह्याद्रीतील काही गडकोट आपली विशेषण मानाने मिरवत आहेत, त्यातीलच एक व आपलं विशेषण जपणारा किल्ला म्हणजे तोरणा किल्ला. प्रचंडगड किंवा गरुडाचे घर म्हणून प्रसिद्ध असलेला, स्वराज्याची पहिली राजधानी राजगडासोबत दिमाखात उभा असलेला असा हा किल्ला. 

31 तारखेला रविवार आल्यामुळे 2 दिवसांचा ट्रेक करण शक्य होत होत. मुंबईहून शनिवारी, 30 डिसेंबरला खाजगी वाहनाने निघालो. सोबत 29 जणांचा चमू होता. पुण्याहून साधारण 64 किमीवर तोरणा किल्ला आहे. पुणे सोडल्यावर पुणे- सातारा रोड वरील नसरापूर फाट्यापासून 30 किमी वर किल्ला आहे. तोरण्याकडे जाताना सिंहगड किल्ला मी इथे आहे याची आठवण करून देतो. सोबतीला पुढे राजगड आहेच. तोरण्याचा अलिकडूनच राजगडाकडे (गुंजवणे गावाकडे) जाणारा मार्ग आहे.


पहाटेच वेल्हामध्ये गावात पोहोचलो. वेल्हे गावातून गडाचा घेरा दिसून येतो, झुंजार माची ची प्रचंडता इथून पहावयास मिळते. वर सोंडेवर पोहोचलो तरी मात्र बिनी दरवाजा काही दिसत नाही. मुळात गडाचे दरवाजे कुठून असतील याचा अंदाज खालून घेताच येत नाही. बुधला माची ची प्रचंडता पाहवयास मात्र आपल्याला बालेकिल्ल्यावर जावंच लागत. अजस्त्र पसरलेली माची त्यावर एखाद्या सुवाशिनीच्या मंगळसूत्रामधील चकाकणाऱ्या काळ्या मण्यासारखा भासणारं बुधला लांबून पण लक्ष वेधून घेतो. 3 तासाच्या चढाई नंतर मेंगाई देवीच्या मंदिरात पोहोचलो. हल्लीच गावातून थोड्यावर पठारावर येण्यासाठी एक गाडीमार्ग झाला आहे, लहान 4 चाकी गाडी येऊ शकते इथपर्यंत. एक तासाभराची चढाई सहज वाचते त्यामुळे.

सर्व चमुची जेवणाची व्यवस्था यशवंती टीम करणार असल्यामुळे अनेक जणांच्या बॅगा 20-25 किलोच्या झालेल्या. ती बॅग खांद्यावरून उत्तरावल्यानंतर अगदी हवेत चालल्याचा भास होत होता. दुपारचे जेवणाचा बेत भात आणि कुळीथाच पिठलं. आमचे आचारी आणि त्या दोन दिवसांचे अन्नदाते हसमुख आणि ऋचा यांच्या कृपेमुळे जेवण मिळाले. दुपारची थोडी विश्रांती घेऊन झुंजार माची दाखविण्याची ठरले. बालेकिल्यावरून एक शिडीद्वारे झुंजार माचीच्या पहिल्या बुरुजावर उतल्यावर झुंजार माचीचे खरे सौन्दर्य दिसते. शत्रूवर अचूक मारा करण्यास अगदी योग्य ठिकाण म्हणजे झुंजार माची. इथे एक दिंडी दरवाजा पण आहे. तेथून आपली मान सांभाळत खाली उतरल्यावर चिलखती बुरुजावर उतरतो, इथूनच उजवीकडून मुख्य माचीच्या टोकाच्या बुरुजावर उतरण्यास मार्ग आहे. मार्ग कसला खरंतर कडाच आहे, इथून जराशी तरी चूक झाली तरी सरळ खोल दरीत खाली. इंग्रजीतल्या उलटा व्ही ( ^) आकाराचा हा बुरुज झुंजार माचीची खरी शान. एक पाण्याचं टाक, बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या अजूनही सुस्थितीत आहेत. इथल्या चिलखती बुरुजावर उतरणारा दिंडी दरवाजा फार लोभस आहे. चिलखती बुरुज फार भक्कम आहे इथला. 
इथूनच डावीकडे राजगड आपल्याला साद देत असतो. वानरांची टोळी आम्हाला जणू परग्रहावरून आलेल्या माणसासारखी टक मक पाहत होती.

सूर्यास्ताच्या वेळी पर्यंत पुन्हा मंदिराच्या परिसरात येऊन तंबू लावणे आणि रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. घरी जाणाऱ्या सूर्याच्या किरणांनी तयार झालेल्या तांबडी कॅनवासवर बालेकिल्ल्याचा एका बुरुजाचा फार सुंदर फोटो मिळाला. तसाच जाणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांवर मेंगाई देवी च्या मंदिराचा पण मस्त फोटो मिळाला. जशी सायंकाळ उतरत गेली तशी थंडी वाढत होती त्यात बोचरा वारा अजून त्रास देत होता. तंबू असल्यामुळे निदान वारा तरी त्रास देत नव्हता. आदल्यादिवशीचा रात्रीचा प्रवास आणि दमछाक करणारी चढाई आणि भटकंती यामुळे रात्री गपचूप झोपले सगळे. सकाळी उठलो तेव्हा अगदी राजगडाच्या मागच्या बाजुहून सुर्यमामा च्या आगमनाची चाहूल येऊ लागली. संपूर्ण आकाशावर तांबडं पसरण्यास सुरुवात झाली होती. आणि सूर्याचे आगमन झाले तेव्हा त्याचे रूप बघून असं वाटलं की कदाचित याच उगवत्या सूर्याची प्रेरणा रोज महाराज घेत असत. सूर्योदयाच्या त्या क्षणाला स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडकडे पाहून असं मनात आलं कि किल्ले राजगडावरील प्रत्येक दगड सूर्याला सांगत असावा की तुझ्याइतकच तेज देणारा जाणता राजा माझ्या अंगा खांद्यावर खेळला. ते सूर्योदयाचे अप्रतिम क्षण केमरात साठवून नाश्ता करण्याची तयारी सुरू केली. लगोलग पोहे आणि चहा असा नाश्ता करून बुधला माचीकडे कूच केली.
बालेकिल्ल्यावरील कोकण दरवाजाची शासनतर्फे डागडुजी करण्यात आली आहे. तिथून पुढे हत्ती नाळ च्या बाजूने बुधला माचीवर उतरण्यास सुरुवात केली. हल्ली अनेक ठिकाणी रेलिंग्स लावले आहेत. काही वर्षांपूर्वी याच मार्गावर दोन हात करून उतराव लागत असे. इथूनच पुढे बुधल्याच्या डाव्याबाजूने बुरुजावर जाता येते इथूनच राजगडाकडे जाणारी वाट आहे. साधारण 7- 8 तासात इथून राजगडावर पोहोचता येते. चित्ता दरवाजा, वाकजाई दरवाजा तसे अजूनही दुर्लक्षितच वाटतात. इथूनच पुढे बुधल्याच्या पुढच्या बाजुला एक छोटासा सुळका आहे तेथेही वर चढत जाता येते. साधारण 2- 2.30 तास तरी नक्की जातात बुधला माची बघण्यासाठी. दुपारचे जेवण गडाखालील तोरणा विहार हॉटेल मध्ये असल्याकारणाने असल्यामुळं वेळेत खाली उतरण गरजेचं होतं. उन्ह वाढत होत, म्हणून लगोलग सर्वांना गड उतरविण्यास सुरुवात केली. उतरतेवेळी मधमाश्यांच्या एका समूहाने अचानक हल्ला चढवला पण त्यात कोणाला दुखापत नाही झाली नशीब. हल्ली राजगडावर तर मधमाश्यांचा हल्ला नेहमीचाच झालेला ऐकण्यात येतो. साधारण २ तासात गरुडाच्या घरट्यातून मानवी वस्तीत आलो. गडाखालील हॉटेल मध्ये जेवण करून परतीचा प्रवास सुरु केला. एक आयुष्यभर पुरेल अश्या आठवणींची शिदोरी घेऊन परत मुंबईत यायला निघालो पण जीव मात्र तिथेच अडकलेला...

वेल्हे गावात जाण्यासाठी सकाळी ६.३० वाजता स्वारगेट स्थानकातून पहिली एस. टी. आहे नंतर १.३० -२  तासाच्या अंतराने बस उपलब्ध आहेत. गडावर पोहोचण्यास २.३० तास पुरेसे होतात. पाण्याची उपलब्धता असली तरी एक छोट्याश्या स्रोतातुन येणारे  पाणी फक्त पिण्यायोग्य आहे. गडावर राहण्याची व्यवस्था मेंगाई देवी मंदिर व त्यासमोर मंदिर, दारू कोठार व इतर ठिकाणी तंबू ठोकून करता येते. जेवणाची व्यवस्था मात्र आपली आपणच करावी लागते. तसे काही गावकरी गडावरवर मसाले भात, चहा, पोहे, पाण्याची बाटली असे पदार्थ पुरवितात मात्र मोठा ग्रुप असेल तर आपली व्यवस्था आपणचं करावी. 

धन्यवाद,

गौरव भावे,


यशवंती Adventures, गिरगांव

काही फोटो:-